गाव समृद्ध करण्यासाठी महिलांचा सहभाग गरजेचा – डीवायएसपी अश्विनी शेंडगे | Tasgaon| Sangli

गाव समृद्ध करण्यासाठी महिलांचा सहभाग गरजेचा – डीवायएसपी अश्विनी शेंडगे

तासगाव | प्रतिनिधी

     महिला सक्षमीकरण करणे ही काळाची गरज आहे देश समृद्ध करायचा असेल तर गाव समृद्ध केले पाहिजे आणि गाव समृद्ध करण्यासाठी महिलांचा सहभाग महत्त्वाचा आहे असे उद्गार डीवायएसपी अश्विनी शेंडगे यांनी पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या सावर्डे येथील विशेष श्रमसंस्कार शिबिरात बोलताना काढले .त्या पुढे म्हणाल्या मुलींचा सन्मान करा , त्यांना चांगले शिक्षण द्या .मनात आणलं तर प्रत्येक गोष्ट आपण शक्य करू शकतो . आपण स्वतः कसे घडलो हे सांगून चांगले संस्कार मुलांवर करण्याचा सल्ला त्यांनी दिला. रागावर नियंत्रण ठेवून महिलांनी अधिकारी ,उद्योजक होऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे आवाहन केले.

            कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना गटविकास अधिकारी सौ. दीपा बापट यांनी ग्लोबल वॉर्मिग ,पर्यावरण समस्या , पाणी व्यवस्थापन या विषयावर सखोल मार्गदर्शन केले . ‘बदलते हवामान समस्या आणि उपाय ‘ या विषयावर मार्गदर्शन करताना भूगोलशास्त्र विभाग प्रमुख डॉ. अर्जुन वाघ यांनी जैवविविधता टिकवून ठेवणे हाच पर्यावरण संतुलनाचा एकमेव उपाय असल्याचे सांगितले.यावेळी बोलताना प्रा. किशोर पाटील यांनी संस्काराचे महत्त्व पटवून दिले तर उद्योजक प्रकाश औताडे यांनी मुलांना आदर्श नागरिक बनवण्यासाठी कुबड्यांचा आधार न देण्याचे आवाहन केले.यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक प्रा.अभय जायभाय यांनी महाविद्यालयाने राबवलेल्या उपक्रमाचे कौतुक केले.

    कार्यक्रमाला सांगली जिल्हा समन्वयक प्रा.पोपटराव माळी , एस के न्यूज संस्थापक-संपादक संजय काळे ,ज्ञानराज टीव्ही चे उपसंपादक राजाराम गुरव , उद्योजक अरुण बापू पाटील , यशवंत शिंदे , पुजा मॅडम ग्रामपंचायत सदस्य वसंतरावदादा पाटील महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी डॉ.तातोबा बदामे , डॉ.अमोल सोनवले , डॉ.पी.बी.तेली , प्रा. आण्णासाहेब बागल , प्रा. साईनाथ घोगरे ,डॉ.हाजी नदाफ , प्रा.पल्लवी मिरजकर , प्रा.शामल पाटील , प्रा.सविता कोळेकर यासह महाविद्यालयातील विद्यार्थी गावातील ग्रामस्थ महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Published by SK NEWS MARATHI