संविधानिक मूल्ये संतविचारांना पुढे नेणारी – ह.भ.प. ज्ञानेश्वर बंडगर | Miraj | Sangli

संविधानिक मूल्ये संतविचारांना पुढे नेणारी – ह.भ.प. ज्ञानेश्वर बंडगर

राष्ट्र सेवा दल मालगांव शाखेच्या वतीने आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती निमित्त संत साहित्यातील संविधान मूल्य या विषयावर कीर्तन कार्यक्रमा प्रसंगी ते बोलत होते.

फुले – शाहू – आंबेडकर हा आपल्या महाराष्ट्राचा वारसा आहे. या तिनही महामानवांवर वारकरी संतविचारांचा प्रभाव आहे. महात्मा फुल्यांना सत्यशोधक समाजाच्या स्थापनेची प्रेरणा कबीरांच्या विचारातून तर राजर्षी शाहू महाराजांना आदर्श राज्यकारभाराची प्रेरणा तुकोबारायांच्या अभंगातून मिळाली होती. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर कबीरांना गुरू मानत असत. त्यामुळे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या भारतीय संविधानिक मूल्यांचा वारसा संतपरंपरेतून उत्क्रांत झाला आहे असं हभप ज्ञानेश्वर बंडगर यांनी सांगितलं. ‘जे का रंजले गांजले। त्यासी म्हणी जो आपुले॥’ या तुकोबारायांच्या अभंगावर कीर्तन करताना निरूपणातून त्यांनी ही मांडणी केली.
यावेळी मालगांव चे सरपंच अनिता क्षीरसागर, उपसरपंच तुषार खांडेकर, तंटामुक्त समितीचे प्रा. सदानंद काबाडगे, कामगार नेते अमृतराव सूर्यवंशी,ऍड. पुष्पा शिंदे, कपिल कबाडगे, राष्ट्र सेवा दलाचे रोहित शिंदे,युवराज मगदूम,बाळासाहेब पाटील, डॉ. रवी गवई, गंगाधर तोडकर आदि मान्यवर उपस्थित होते…
कीर्तनात त्यांनी सांगितलं की, डाॅ. बाबासाहेबांसारखे समाजातल्या रंजल्या गांजल्या लोकांविषयी कळवळ असलेले महापुरुषच खऱ्या अर्थाने संत आहेत. केवळ संतांचा वेष पांघरुन कोणाला संत होता येणार नाही. त्यासाठी समाजातल्या शेवटच्या घटकातल्या लोकांसाठी काम करण्याची तयारी ठेवायला हवी.
नामदेवरायांनी दासी असलेल्या जनाबाईंना कीर्तन संचलनाचा अधिकार सातशे वर्षांपूर्वी दिला. जनाबाई माऊली वारकरी संप्रदायातल्या अधिकारी संत गणल्या गेल्या आहेत. हे सगळं कार्य वारकरी संतांनी समतेच्या आणि बंधुभावाच्या भावनेतून केलं. भारतीय संविधानातून हाच विचार व्यक्त होता असं ते म्हणाले.या कार्यक्रमाचे आभार राज कांबळे यांनी मानले.


याचे संयोजन किरण कांबळे, सुभाष माळी, राहुल होनमोरे, मनीषा कांबळे, राज कांबळे,गुंजन उगारे,मोनिका भंडारे,सुनील कांबळे, रोहिणी कांबळे, प्राची कदम, वैशाली कदम आदींंनी केले.

Published by SK NEWS MARATHI