▪️तासगाव बाह्य वळण (बायपास रोड) रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला
▪️खासदार संजय काका पाटील यांच्या पाठपुराव्याला यश!
▪️15 वर्षापासून प्रलंबित प्रश्न अखेर मिटला
▪️आता तासगाव शहराची वाहतुकीची कोंडी मिटणार
तासगाव,दि.8 मार्च (तासगाव : प्रतिनिधी)
गेल्या दहा-पंधरा वर्षांपासून प्रलंबित असलेल्या तासगाव शहराच्या बाह्य वळण रस्त्याचा प्रश्न अखेर मिटला. खासदार संजय काका पाटील यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी याबाबचा निधी अर्थसंकल्पामधे मंजुर करुन दिल्याने आता तासगाव शहराची वाहतूकीची कोंडी सुटणार आहे. या संदर्भात नुकत्याच मंत्रालयात झालेल्या बैठकीत भूसंपादनासह रस्त्याचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे राखडलेला प्रश्न मार्गी लागला आहे.
तासगाव शहर हे सांगली जिल्ह्याच्या केंद्रस्थानी असून शहरातून सांगली-बारामती, पेठ-पंढरपूर, गुहागर-विजापूर हे राज्य व राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने शहरातील वाहतुकीची जास्त कोंडी होत आहे. शहरातून जाणारी अवजड वाहने, शहराअंतर्गत वाहतूक यामुळे सतत वाहतुकीचा प्रश्न निर्माण होत आहे. शहराबाहेरातून जाणारा बाह्य वळण रस्ता तांत्रिक कारणाने गेल्या दहा-पंधरा वर्षांपासून रखडला आहे. त्यामुळे तासगावकराना वाहतुकीच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. खासदार संजय काका पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावला आहे. तासगाव शहाराच्या बाहेरून जाणाऱ्या विटा रोड ते भिलवडी रोड या बायपास रस्त्याच्या भुसंपादनाचा निधी मंजूर झाला आहे. तसेच भिलवडी रोड ते सांगली रोड,आणि विटा रोड ते भिवघाट रोड(पुणदी रोड), ते चिंचणी रोड ते मणेराजुरी रोड ते कवठेएकंद मार्गे सांगली रोड या बाह्य वळण रस्त्याचा राष्ट्रीय महामार्गात समावेश करण्यात आला आहे.
राज्यशासनाच्या या निर्णयाबद्दल खासदार संजय काका पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे आभार मानले आहे.
Published by SK NEWS मराठी,तासगाव (सांगली)