खंडोबाचीवाडी व कुंडल या दोन ग्रामपंचायतींचा देशात पहिला नंबर | ग्रामपंचायतींना मिळणार प्रत्येकी १ कोटीचे बक्षिस | पलूस |Sangli

खंडोबाचीवाडी व कुंडल या दोन ग्रामपंचायतींचा देशात पहिला नंबर | ग्रामपंचायतींना मिळणार प्रत्येकी १ कोटीचे बक्षिस

पलूस | प्रतिनिधी :

केंद्र शासनामार्फत दिला जाणारा प्रथम क्रमांकाचा राष्ट्रीय पंचायत पुरस्कार पलुस तालुक्यातील खंडोबाचीवाडी व कुंडल या दोन ग्रामपंचायतींना मिळाला आहे. दिनदयाळ उपाध्याय पंचायत सतत विकास पुरस्कारासाठी जिल्ह्यातील दोन ग्रापंचायतींची निवड झाली असुन दोन वेगवेगळ्या थिममध्ये दोन्ही ग्रामपंचायती देशात अव्वल ठरल्या आहेत.

गरिबीमुक्त व वर्धित उपजिविका पंचायत या थिममध्ये खंडोबाचीवाडी ग्रामपंचायतीचा देशात प्रथम क्रमांक आला आहे. खंडोबाचीवाडी ग्रामपंचायतीने ग्रामस्थांना आर्थिकदृष्ट्या सक्षम व आत्मनिर्भर बनविण्यासाठी अनेक शासकीय योजनांचा लाभ मिळवुन देण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते. या छोट्याशा गावाने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम व स्वावलंबी होण्यासाठी २८ बचत गट निर्मीत केली आहेत. या बचतगटांमार्फत गावातील महिलांना २८ लाखांचे कर्जवाटप करणेत आले आहे. या रक्कमेतुन महिलांनी कापड दुकान, शिलाई व्यवसाय, गारमेंट उद्योग, किराणा व्यवसाय, मिरची कांडप, ब्युटी पार्लर, कुक्कुटपालन, पशुपालन व दुग्धव्यवसाय, शेळीपालन असे व्यवसाय सुरू केले आहेत. त्यामधून महिलांना वर्धीत उपजीवकेची साधने उपलब्ध झाली आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत १४ घरकुले मंजुर झाली आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत गावातील ३४९ शेतकऱ्यांना लाभ देणेत आला आहे. राष्ट्रीय सामाजिक सहाय्य योजनेंतर्गत गावातील २२ दिव्यांग व महिलांना संजय गांधी निराधार पेन्शन योजना व श्रावणबाळ योजनेचा लाभ दिला जातो. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत अन्नसुरक्षा योजनेचा ३६७ लाभार्थ्यांना लाभ दिला जातो. प्रधानमंत्री जनधन योजनेंतर्गत ४०३ लाभार्थींचे खाती उघडणेत आली आहेत. यासह विविध शासकीय योजनांचे लाभ ग्रामस्थांना मिळवुन दिल्याबद्दल ग्रामपंचायत खंडोबाचीवाडी देशात अव्वल ठरली आहे.


तसेच पलुस तालुक्यातील कुंडल ग्रामपंचायतीला स्वच्छ आणि हरित गांव या थिममध्ये देशातील प्रथम क्रमाकांचे बक्षिस मिळाले आहे. गावामध्ये ५ लाख लिटर प्रतिदिन क्षमतेचा वेस्ट वाॅटर ट्रिटमेंट प्लॅन्ट आहे. ३५ सोलर स्ट्रिटलाईट आहेत व सर्व रस्त्यांवर आणि संपुर्ण गावातील घरांमध्ये एलईडी बल्ब आहेत. गाव संपुर्ण हागंणदारी मुक्त आहे. पर्यावरण पुरक घनकचरा व सांडपाणी प्रकल्प गावामध्ये उभारणेत आला आहे. ओला व सुका कचरा वेगवेगळ्या २०० डस्टबिनद्वारे गोळा केला जातो. १५०० एकर जैविक पद्धतीने शेती करणेत येते. या वैशिष्ट्यपूर्ण कामांमुळे खंडोबाचीवाडी व कुंडल या दोन्ही ग्रामपंचायतींना दोन्ही थिममधील देशात प्रथम क्रमांकाचे पारितोषिकाचे प्रत्येकी १ कोटी रुपयांचे बक्षिस मिळणार आहे. १७ एप्रिल रोजी सदर पुरस्कारांचे वितरण दिल्ली येथे राष्ट्रपती महोदयांचे हस्ते होणार असून त्यामध्ये सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. तानाजी लोखंडे, पलुस पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी डाॅ. स्मिता पाटील, विस्तार अधिकारी श्रीधर कुलकर्णी, विस्तार अधिकारी व कुंडल ग्रामपंचायतीचे प्रशासक डी.सी.खाडे, ग्रामविकास अधिकारी महादेव यल्लाटे, खंडोबाचीवाडीचे सरपंच धनंजय गायकवाड व ग्रामसेवक स्वप्नगंधा बाबर यांचा विशेष सत्कार होणार आहे.

Published by SK NEWS Marathi