प्रभाकरबाबा पाटील हेच 2024 ला आमदार
माजी मंत्री,आ. सुभाष देशमुख यांचा विश्वास
( तासगाव प्रतिनिधी ) तासगाव – कवठेमहांकाळ विधानसभा मतदार संघातून युवा नेते प्रभाकर पाटील हेच आमदार होतील. आगामी विधानसभा निवडणूकीत ते मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास माजी मंत्री व विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांनी व्यक्त केला.
ते ‘मोदी @९ महाजनसंपर्क अभियान’ अंतर्गत तासगाव येथे खासदार संजय पाटील यांच्या संपर्क कार्यालयात झालेल्या कार्यकर्ता बैठकीत बोलत होते.
यावेळी आमदार देशमुख म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश जगात नावलौकीक वाढवत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजप प्रणित केंद्रातील सरकारला 9 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त ‘मोदी @९ महाजनसंपर्क अभियान’ देशभर राबविण्यात येत आहे. सांगली जिल्ह्यात खासदार संजय पाटील हे विकासकामांच्या माध्यमातून लोकांच्या पुढे जात आहेत. तोच वारसा त्यांचे चिरंजीव युवा नेते प्रभाकर पाटील चालवित आहेत. त्यांना उज्वल राजकीय भविष्य आहे.
ते म्हणाले, प्रभाकर पाटील यांच्या कर्तृत्वामुळेच भाजपाने त्यांची तासगांव – कवठेमहांकाळ मतदारसंघाच्या निवडणूक प्रमुखपदी निवड करून पक्षाने त्यांचा सन्मान केला आहे. तासगांव कवठेमहांकाळ हे दोन्ही तालुके वर्षानुवर्षे दुष्काळाच्या दुष्टचक्रात अडकलेले होते. सन 2014 ला खासदार संजय पाटील प्रथम खासदार झाल्यानंतर हजारो कोटी रूपयांचा केंद्र व राज्य सरकारच्यामार्फत निधी आणला. त्यामुळे गेल्या 9 वर्षात अनेक भागातील गावांच्या बांधावर शेतीचे पाणी पोहोचले आहे. तसेच राष्ट्रीय महामार्गाच्या कामांच्या माध्यमातून दळणवळणाची चांगली सुविधा निर्माण झाली आहे.
खासदार पाटील जिल्ह्यात फिरत असताना आपले होमग्राउंड असलेल्या तासगाव व कवठेमहांकाळ तालुक्याकडे त्यांच्यासह प्रभाकर पाटील अहोरात्र लक्ष ठेवून कामे करीत आहेत. त्यामुळे अल्पावधीतच प्रभाकर पाटील लोकप्रिय नेते म्हणून उदयास आले आहेत. त्यांना आता विकासाच्या दूरदृष्टीमुळे तासगांव कवठेमहांकाळची जनता आताच आपला आमदार म्हणून त्यांच्याकडे पाहत असल्याचा गौरव शेवटी आमदार देशमुख यांनी केला.
यावेळी प्रभाकर पाटील म्हणाले, भाजपा केंद्र सरकारला ९ वर्षे पुर्ण झल्यानिमित्त ‘मोदी @ ९ महाजन संपर्क अभियान’ अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी व खासदार संजय पाटील यांनी केलेली विकास कामे तळागाळातील नागरीक व मतदारापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न आम्ही या अभियानातून करणार आहे.
स्वागत व प्रास्ताविक भाजपाचे परसू नागरगोजे, भाजपा तालुकाअध्यक्ष सुनिल पाटील यांनी केले. यावेळी तासगाव शहराध्यक्ष हणमंत पाटील, भाजपा जेष्ठ नेते माणिक जाधव, भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष डॉ. पी. के. पाटील, संभाजी पाटील सावर्डेकर, माजी नगराध्यक्ष जाफर मुजावर, अविनाश पाटील, तालुकाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा, तासगाव दिग्विजय पाटील, शंकर वैद्य, अरुण साळुंखे, संदीप सावंत, मोहन पाटील, कृष्णा पाटील, मारुती एडके, विनायक खरमाटे उपस्थित होते. आभार माजी नगराध्यक्ष अविनाश पाटील यांनी मानले.
Published by SK NEWS Marathi