आदित्य येसुगडे, प्रतीक जाधव यांची कुमार गट राज्य कब्बडी स्पर्धेसाठी निवड अभिजित कोळेकर सांगली जिल्हा संघाच्या प्रशिक्षकपदी : श्रीपाद थोरबोले व्यवस्थापकपदी

आदित्य येसुगडे, प्रतीक जाधव यांची कुमार गट राज्य कब्बडी स्पर्धेसाठी निवड

अभिजित कोळेकर सांगली जिल्हा संघाच्या प्रशिक्षकपदी : श्रीपाद थोरबोले व्यवस्थापकपदी

(तासगाव प्रतिनिधी)

नांदेड येथे होणाऱ्या कुमार गट फेडरेशन चषक राज्य कबड्डी स्पर्धेसाठी सांगली जिल्ह्याच्या संघात तासगाव येथील स्वराज्य फाउंडेशनचे खेळाडू आदित्य शितल येसुगडे व प्रतीक रवींद्र जाधव यांची निवड झाली आहे. तर अभिजीत विजय कोळेकर यांची सांगली जिल्हा कबड्डी संघाच्या प्रशिक्षकपदी तसेच श्रीपाद अशोक थोरबोले यांची व्यवस्थापकपदी निवड झाली आहे.

तासगाव येथील स्वराज्य फाउंडेशनने गेलेल्या काही वर्षात अनेक खेळाडू घडवले आहेत. विविध क्रीडा प्रकारात या फाउंडेशनचे अनेक खेळाडू जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवर खेळत आहेत. या खेळाडूंना अभिजीत कोळेकर, श्रीपाद थोरबोले यांच्यासारख्या अनेक ज्येष्ठ खेळाडूंचे मार्गदर्शन लाभते. खेळाडूंचा कल व त्यांच्या अंगी असणारे गुण ओळखून त्याला मार्गदर्शन केले जाते. याशिवाय राज्यभर विविध ठिकाणी होणाऱ्या स्पर्धांमध्ये या फाउंडेशनचे खेळाडू सहभागी होत असतात. अल्पावधीत या फाउंडेशनने राज्यभर आपला नावलौकिक मिळवला आहे.

या फाउंडेशनने कबड्डीचा तगडा संघ तयार केला आहे. तासगावसह ग्रामीण भागातील अनेक खेळाडूंना या फाउंडेशनने चालना दिली आहे. नुकत्याच सांगलीवाडी येथे झालेल्या कुमार, कुमारी गट निवड चाचणी स्पर्धेमध्ये या फाउंडेशनच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली होती. आदित्य येसुगडे व प्रतीक जाधव हे दोन्ही खेळाडू सांगली जिल्ह्याच्या कबड्डी संघात खेळले होते. यातील प्रतीक जाधव हा खेळाडू तर सांगलीच्या संघाचा कर्णधार होता. तर आदित्य येसुगडे याची महाराष्ट्राच्या कबड्डी संघात निवड झाली होती. उत्तराखंड येथे राष्ट्रीय पातळीवरील झालेल्या कबड्डी संघात येसुगडे याने महाराष्ट्राच्या संघातून प्रतिनिधित्व केले होते.

आता नांदेड येथे होणाऱ्या कुमार गट फेडरेशन चषक राज्य कबड्डी स्पर्धेसाठी पुन्हा आदित्य येसुगडे व प्रतीक जाधव या दोन्हीही खेळाडूंची सांगली जिल्ह्याच्या कबड्डी संघात निवड झाली आहे. तर याच फाउंडेशनचे जेष्ठ खेळाडू अभिजीत कोळेकर यांची सांगली जिल्हा कबड्डी संघाच्या प्रशिक्षक पदी व श्रीपाद थोरबोले यांची व्यवस्थापक पदी निवड झाली आहे.